अबोला गाजला होता

मयुरेश साने - ⏱ १ मिनिट

तुला पाहून माझा शब्द - तेव्हा लाजला होता
मुका राहुनही मझा - अबोला गाजला होता

तुझा तो स्पर्श चंदेरी -तुझा तो हात पुनवेचा
उन्हाचा हात ही माझा - अचानक भाजला होता

जरी बेताल मी आहे - नव्हे हा कैफ मदिरेचा
तिने सौंदर्य वर्खाचाच - प्याला पाजला होता

तुझा मुखचंद्रमा पाहून मुखडा गाइला होता
चेहरा रोजचा दु:खी - सुखाने माजला होता

असे स्वप्नात ही व्हावे ? तुला मी फूल देताना
घड्याळातून काटेरी -गजर ही वाजला होता

मला पाहून आताशा - म्हणे हा आरसा मजला
असा मयुरेश नाही पाहिला - जो आजला होता.

मयुरेश साने...दि...२९-डिसेंबर-१०

गझल