आता मला गवसला आभास आसवांचा
दडपून ठेविला मी जो श्वास आसवांचा
मज कोडग्या मनाने जगणे पसंत नाही
वाटे हवाहवासा मज त्रास आसवांचा
रेखाटतो सुखाची मी रंगहीन चित्रे
डोळ्यांत रंग भडके सर्रास आसवांचा
पत्रात भेटल्या मज फिक्कट अबोल ओळी
ताजाकलम असावा त्या खास आसवांचा
एकादशीस विठ्ठल आला घरात माझ्या
मी सोडला कधीचा उपवास आसवांचा
जगण्यास जे परीक्षा संबोधतात त्यांनी
केला कधी पुरेसा अभ्यास आसवांचा?
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा