======================
अढी कपाळावरील जेव्हा मनात गेली..
कडू विषाची कुपी जणू जीवनात गेली
अता समजली मला सुखाची प्रमाणव्याख्या,
अता समजले- कितीक वर्षे भ्रमात गेली..
तुझा दुरावा भरून आहे क्षणात सार्या..
निदान आता विवंचनांची ददात गेली !
"यदा-यदा.."चा कधीच नाही दिलास प्रत्यय,
किती युगे आमची तुला पाहण्यात गेली !
कडे- कपारी मधून सांगे मुकी रियासत
"रणात आम्ही कमावली, ती तहात गेली"
लपून तू राहिलास माझ्यामधेच वेड्या...
सुखा ! तुला शोधण्यात माझी हयात गेली !
-ज्ञानेश.
=======================
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा