शब्द आता संपले ओलावणारे
जे उरे, शब्दात ते ना मावणारे
वागणे वेड्यापरी ना रम्य वाटे
पाहिजे होते कुणी रागावणारे
अन्यथा मृत्यू कसा येणार सांगा?
शौक होवो प्रकृती खालावणारे
दे जरा संजीवनी, ये, घेउदेना
गंध त्या वक्षातले नादावणारे
दोन जाती माणसांच्या भूतली या
घालणारे घाव, कोणी चावणारे
धाडकन पडताच गर्दी काय झाली!
तेच खड्डे खोदती, जे धावणारे
तेवढे ठेवून घेतो दु:ख आम्ही
जेवढे ह्रदयात आहे मावणारे
मी न त्यांना पावतो, या कारणाने
देव माझा शोध घेती ,'पावणारे'
मैफिलीमध्ये मलाही घ्याल ना रे?
शेर माझे लोचने पाणावणारे!
गझल झाली, प्रेम झाले, उमर झाली
शोधुया धंदे चलारे फावणारे
एकही टिच्चून नाही राहिला रे
खूप होते या मनी डोकावणारे
जिंदगीमध्ये जराशी खोट वाटे
अंत गाई गीत आम्हा भावणारे
लावली आतून ज्यांनी आजवरती
तेच बाहेरून आगी लावणारे
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा