आज फुलांची भाषा.....
आज फुलांची भाषा मजला कळते आहे
फूल होऊनी ऊर बघा दरवळते आहे
उष्म उसासे टाकीत आली, झुळूक कशी ही?
कोण आज त्या दूर तिथे तळमळते आहे?
शांत सागरा, आज कश्या ह्या निमूट लाटा?
आज काय रे तुझ्या मनी खळबळते आहे?
आज वाल्मिकी पुन्हा करु सुरवात नव्याने,
क्रौन्च होऊनी ऊर अता भळभळते आहे
एक पालखी हाय, जरी ही दूर निघाली,
नजर ’आतली’ मात्र मजकडे वळते आहे!
आज जरी हा पिंपळ इथला वठून गेला ,
एक-एक हे पान बघा; सळसळते आहे!
- मानस६
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा