आले वादळ गेले वादळ कसे न मिटले
आठवणींच्या वाळूवरचे ठसे न मिटले
अंतरातला कोलाहल मी आत कोंडला
या माझ्या पण ओठावरचे हसे न मिटले
जिंकुन गेले दुर्दैवच ती कासव शर्यत
पण मनातल्या इच्छेचे ते ससे न मिटले
डोळ्यादारी प्राण ओतुनी उभी प्रतिक्षा
मिटले होते डोळे क्षणभर जसे न मिटले
जळले विझले विझले जळले ह्रदय कोवळे
हाय तरी पण तिला हवे ते तसे न मिटले
घे खांद्यावर तुच आपुली त्यागपताका
मी वचनाचा बांधिल माझे वसे न मिटले
.....अनंत नांदुरकर (खलिश)
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा