अलिप्तता

ऋत्विक फाटक - ⏱ १ मिनिट

मनामनामधे दडून राहिली अलिप्तता
मिठीत देह गोठले तरी उरी अलिप्तता!

मिठासदार चार अक्षरे वदून, अंतरी
कशी अभिन्न भावशून्य राहिली अलिप्तता?

धुमार पावसातही भिजून अंग कोरडे
अशी जडून कातडीस राहिली अलिप्तता!

अफाट ज्ञान सागरासमान लोटले तरी
इथे दडून शिंपल्यात राहिली अलिप्तता!

कुणी जगा सुखाविण्या अरण्यवास भोगतो
अशी कुठेतरी दिसून ये खरी अलिप्तता!

गझल