आलीस पावसाची, भिजवीत पावसाला
आली मशाल कैसी , जाळीत पावसाला !
भर पावसात पडले उन कोवळे जरासे
आले जसे किरण हे माळीत पावसाला ।
पदरात झाकले तू लावण्य मुक्त जैसे
हळुवारश्या रुपेरी कल्हईत पावसाला ।
घोटात राख वाटा तू कोरड्या गळ्यांचा
कवितेत काय बसला पोशीत पावसाला !
चिक्कार झाली झाडे,चिक्कार झाली शहरे
प्रगतीस ओघ आला, विझवीत पावसाला ।
'है हिम्मते खुदा तो',पिकवून दाव बागा
वाचीत काय बसला राशीत पावसाला !
अंगाई गात वारा, सोडून आज मस्ती
धारांमधून जातो निजवीत पावसाला ।
थंडी गुलाब झाली,भिजला दवात वारा
चल ये मिटून घेऊ दुलईत पावसाला ।
पाण्यास काय झाले ,का नाचल्या त्सुनामी
वरचेवरी भयाने गोठीत पावसाला ।
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा