अंतरा

क्रान्ति - ⏱ १ मिनिट

शह-प्रतिशह माझ्याच मनाचे, वजीर मी अन् मीच मोहरा
अविरत दिसतो जुन्या दर्पणी मलाच माझा नवा चेहरा

खोल विवर मन, गूढ विलक्षण, अथांग गहिरे, ठाव न लागे
शांत नदीच्या पात्रामधला गहन, अनाकलनीय भोवरा

कुठे अता त्या नात्यांमधला ओलावा जपणार्‍या भिंती ?
अदृष्टाची काळी छाया थांबविणारा कुठे उंबरा ?

खुणा कालच्या विध्वंसाच्या जपुन आज का शाप भोगणे ?
आज जगा मस्तीत, उद्याचे कोसळणारे स्वप्न सावरा

किती रंग चढवले, उतरले, जशा भूमिका बदलत गेल्या
रोज बदलले किती मुखवटे, कुणास ठाउक कोणता खरा ?

मनात नसता कसे जुळावे लयतालाशी सुरेल नाते ?
स्थायीला ना स्पर्श सुरांचा, सांग कसा गाणार अंतरा ?

गझल