अंतराय

ज्ञानेश. - ⏱ १ मिनिट

=====================


अजून  दु:ख  वेगळे  असेल  काय  यापुढे?
जगायचे  मला  अता  तुझ्याशिवाय  यापुढे..


अनोळखी  छटा  तुझ्या  मुखावरील  सांगते,
'अनोळखी' म्हणून  मी  तुला  हवाय  यापुढे


नको  पडायला  अता  नवीन  प्रश्न  आणखी;
नको  सुचायला  मला  नवे  उपाय  यापुढे


किती  पवित्र  दोर  हा  तिच्या  गळ्यात  बांधला..
तिचा  न  उंबर्‍यातुनी  निघेल  पाय  यापुढे !


दगावला  असेलही  मधाळ  बंध  आपला,
जगायला  हवा  निदान  अंतराय  यापुढे...


 


 


-ज्ञानेश.
=====================

गझल