अर्थ

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

सांगून अर्थ सारे तुजला कळे न काही
कळले कसेबसे... जे वळले असे न काही

एकाच बंधनाने बधलो जरूर होतो
जाळून हृदय माझे, जळले तुझे न काही

जखमा अनेक होत्या फांदीवरी फुलांच्या
तोडून वृक्ष, जखमा पुसल्या असे न काही

मिळवून लाख रत्ने गुर्मीत वर्ष गेली
तो एक दिवस येता माझे उरे न काही

'गंगेस प्राप्त झालो' सागर म्हणे शिवाला,
'आता तुझेच सारे, मी ठेवले न काही'

दीपावलीत जेंव्हा विझतील चांदण्याही
मागा प्रकाश माझा, सृष्टी भरेन काही

जाणीव होत माझी तृष्णा मिटे न काही
ओतून 'अर्थ' उपरे पेला भरे न काही

गझल