अताशा चांदण्याशी भांडण्यातच रात्र जाते त्रास होतो त्रास नुसता
पहाटे मात्र जाणवते पुरे आहे जगाया पौर्णिमेचा भास नुसता
तुझा थरकाप नाही होत का पाहून टिकल्यांची अशी रेघाळ नक्षी
मला तर आपला हा आरसा दिसताच दिसतो क्रूर कारावास नुसता
तिने कित्येकदा संधी दिली पण प्रश्न मी उच्चारला नाही कधीही
परीक्षा द्यायची नव्हती हवा होता मला आयुष्यभर अभ्यास नुसता
अशाने काय होते की फुलावे , ना फुलावे स्पष्ट काही कळत नाही
ऋतूच्या बोलण्यामध्येच जेव्हा शब्द येऊ लागतो "सायास नुसता !"
तुम्हाला काय सांगू मी किती आतूर होतो बरसण्यासाठी अवेळी
अरेरे वेधशाळांनो तुम्ही काढायचा होतात रे अदमास नुसता
असे होते , असे होतेच बाबांनो अशी वेडीपिशी असते असोशी
असा श्वासांत येतो प्रास अन जगण्यात कवितेचा सुरीला न्यास नुसता
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा