सुखे संचारबंदी लावती गाफील दु:खांनो
असे बाहेर डोकावू नका आतील दु:खांनो
किती लांबेल यंदाचा अबोला कल्पना नाही
तुम्हाला पाहिजे तर व्हा तिला सामील दु:खांनो
कुणी नाही इथे आता, सुटा मोकाट कोठेही
निघाला पापणीचा तांबडा कंदील दु:खांनो
सुखे छाटून थोडीशी पुन्हा येईन माघारी
पतंगासारखी देता जराशी ढील दु:खांनो?
मला वाटेल तेव्हा मी मला मानेन आनंदी
कुठे आहात तुम्हीही मला बांधील दु:खांनो?
इथे एकांत होता त्यामुळे मी हासलो थोडा
जरासे पाहिले वागून मी मिश्कील दु:खांनो
चला... अंधारते आहे... मनामध्ये बसा आता
तिन्हीसांजेस करता केवढी किलबील दु:खांनो
तिला कित्येक वर्षांनी पुन्हा भेटायचे आहे
मधे बोलायचे नाही बरे फाजील दु:खांनो?
शिव्यांची देत लाखोली उपाशी मारतो आहे
तरीही नांदता माझ्याघरी सत्शील दु:खांनो?
कुणी येणार आहे वाटते चुचकारण्यासाठी
अशी का लोचने झाली म्हणे स्वप्नील दु:खांनो?
मनाने 'बेफिकिर' व्हा... जन्मतो तो संपतो येथे
पुढे न्या आपली ही पोरकी मैफील दु:खांनो
टीप - सूट - काही र्हस्व दीर्घ!
-'बेफिकीर'!
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा