आता !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

..................
आता !
..................


जगापासून या दडायचे आता !
मलाही मी न सापडायचे आता !


कुणालाही न व्हायचे हवेसेही...
कुणालाही न आवडायचे आता !


पुन्हा का तेच ते, तसेच ते होई ?
नवे काही न का घडायचे आता ?


मिळेना अर्थ, एकही मनाजोगा...
किती मी शब्द पाखडायचे आता ?


असे काही...स्वतःपलीकडेसुद्धा...
स्वतःपाशीच का अडायचे आता ?


पुन्हा सोसायची कशास ती दुःखे ?
पुन्हा प्रेमात का पडायचे आता ?


निरोपाची बरी नव्हेच ही भाषा...
तुझे काही न का नडायचे आता ?


जिवा,  नाही तुझे कुणी कुणी नाही...
कुठे नाहीस तू जडायचे आता !!


कुणीही राहिले कुठे जिव्हाळ्याचे ?
कुणापाशी ? कुठे रडायचे आता ?


- प्रदीप कुलकर्णी

गझल