आवरण

ज्ञानेश. - ⏱ १ मिनिट

न यावी आठवण, आहे पुरेसे
न व्हावे जागरण, आहे पुरेसे..

जरी जगलोच नाही आजसुद्धा
तरी टळले मरण, आहे पुरेसे

जगाला भासतो आहे सुखी मी
मला हे आवरण आहे पुरेसे

तुला विसरायचे आहे ठरवले
तुझे इतके स्मरण आहे पुरेसे

जिथे दिसतात मर्यादा स्वत:च्या
असे वातावरण आहे पुरेसे

पुढे मोठा कुणी होईल तो, पण
मुलाचे मूलपण आहे पुरेसे.

- ज्ञानेश.

गझल