आयुष्य माझे

मिल्या - ⏱ १ मिनिट


मृगजळाच्या व्यर्थ मागे, धावले आयुष्य माझे
आज कळले, कोरडे का भासले आयुष्य माझे


प्रेम ना कोणी दिले अन, ना दिला कोणी जिव्हाळा
कौतुकाने मीच मग कुरवाळले आयुष्य माझे


मोगरा फुललाच नाही अंगणी माझ्या कधीही
त्यास हाती बांधुनी मी! उधळले आयुष्य माझे


पाहुनी बाहेर दु:खे झडप घेण्या थांबलेली
मी सुखाच्या दावणीला बांधले आयुष्य माझे


भाग्य हातांनी घडविले! भ्रम जरी माझा फुकटचा
खेळणे होते तुझ्या हातातले आयुष्य माझे


हासल्यावर तू, कळ्यांचा अंगणी वर्षाव झाला
वेचण्यासाठी फुलांना, वेचले आयुष्य माझे


झापडे लावून मोहाची वृथा फेऱ्यात फिरलो
देहरूपी जोखडाला जखडले आयुष्य माझे






गझल