बिघडले आमचे साचे

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

प्रयोगांचे बिघडलेले करावे काय हे साचे?
असा निर्माण झालो मी पहा हे न्याय देवाचे


दुधाला काय उकळ्या, झाकणे ही थडथडा वाजे
मनी इच्छा निघावी आणि चाले नृत्य देहाचे


किती लोकांस गेलो देत खांदा, ती कुठे आली?
मला नेण्यास आले हे बघा भलतेच लेकाचे


तसा मी वेगळा आतून, भासे वेगळा वरती
न हितसंबंध आम्ही तोडले कधि एकमेकाचे


असे सातत्य त्याला लाभते, जे पाहिजे आहे
बघा बदनाम झालो मद्य घेता नित्यनेमाचे


हजारो जाहली पापे, पुसाया जाब जे आले
न दुसर्‍यासारखे होते कधी आरोप एकाचे


कुणाला हे हवे आहे कुणाला ते हवे आहे
मला जो भेटतो तो उचलतो जे वाटले त्याचे


अरे कंत्राटदारा बांध माझे घर जसे वाटे
कवी तो जो सरळशा अंगणीही वाकडे नाचे


 


 


 


 


 


 


 





 

गझल