उधळून तुझ्यावरी रे, बहरून रात्र गेली,
उठवून उरात वणवा, विझवून रात्र गेली.
चाले हितगूज रे रोज तुझ्याच आठवांशी,
हे वेड जुनेच माझे, उमजून रात्र गेली.
तू सांग कसे हसू मी? मदधुंद या क्षणांशी,
जे घाव दिलेस वर्मी, उगळून रात्र गेली.
झाली इतुकी तुझी रे, मज सवय नीजताना,
शापीत तुझ्याविना मी, ठरवून रात्र गेली.
लागे मजला न चाहूल, मधाळ चांदण्याची,
नसतोस कुशीत जेव्हा, बदलून रात्र गेली.
गेले समजून तेव्हा, सुटणार वाद नाही,
आता रुसवा कसा रे? मिटवून रात्र गेली.
माझे न कुणीच येथे, अवकाश, तारकाही,
का? रे मग काळजाला, बिलगून रात्र गेली.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा