भरोसा

कैलास - ⏱ १ मिनिट

वाटे न जे घडावे ऐसे घडेल आता
ज्याचा असे भरोसा तोची नडेल आता

आधार जो निघाला सरली जमीन ऐसी
आहे उभा तरीही वाटे पडेल आता

सर्वांस दु:ख देतो कित्येक शाप घेतो
वाहून नेत्र जाती ऐसा रडेल आता

येताच हाती सत्ता जो ना दिसे कुणाला
गल्लीतल्या सभेला तो सापडेल आता

खुंटून जाई प्रज्ञा इतुके न आळ्सावे
बुद्धीस चालना दे मेंदू सडेल आता

सुग्रास व्यंजनेही रुचली कधीच नाही
''कैल्या''तुला शिळेही घे आवडेल आता.

डॉ.कैलास गायकवाड

गझल