दिशा गातात ह्या जेव्हा तुझ्या थाटात अंगाई
मला जाणीव होते की इथे नाहीस तू आई
..तरीही राहिले होते हजारो अर्थ स्पर्शांना
मला समजून घेण्याची किती केलीस तू घाई
इथे बहुतेक लोकांना अताशा वाचता येते
दिसावी फक्त एकाला अशी मिळते कुठे शाई
रिते आकाश निरखावे तसा माझा तुला चाळा
उद्या येईल कंटाळा .. उद्या संपेल नवलाई
सुट्या नाण्यांपरी आले नशीबी श्वास हे काही
अशाने सात जन्मांची कधी होणार भरपाई
तुला पाहून आयुष्या पसरले हात मी जेव्हा
मला तू सांग ना तेव्हा कुठे झाली दिरंगाई
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा