आलाप मीलनाचा गा तू जमेल तेव्हा
मीही लिहीन म्हणतो काही सुचेल तेव्हा
आहे तुझ्यात 'सध्या' ते काय नेमके ... की
येतो तुझ्याकडे मी.. कोणी नसेल तेव्हा
भेटूनही तुला का अतृप्त राहतो मी?
ठरतील काय भेटी... हेही कळेल तेव्हा?
भलताच त्रास होतो या छान वागण्याचा
टिकणार कोण आहे पचनी पडेल तेव्हा?
जन्मात एकदाही खोटे न बोललो मी
हेही खरे निघावे खटला चढेल तेव्हा
मी हा असाच आहे, माझे असेच आहे
स्वीकार जे हवे ते, जेव्हा रुचेल तेव्हा
काळास कासवाची असते गती तरीही
दिसतील पंख त्याचे पक्षी उडेल तेव्हा
मी ऐकणार होतो, ते बोलणार होते
जगणार कोण आहे उलटे ठरेल तेव्हा?
हल्ली सुगंध येतो विरहासही कशाने?
सांगेन, एकदाचा पेला भरेल तेव्हा
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा