दुःख गोठलेले मी... !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

...................................
दुःख गोठलेले मी... !
...................................

दुःख गोठलेले मी; ओघळायचो नाही !
अन् कधी कुणालाही मी कळायचो नाही !

ये समीप; घे हाती हात...बोल तू काही....
दोन-चार शब्दांनी मी मळायचो नाही !

ब्याद मी स्वतःसाठी अन् बला तुझ्यासाठी...
टाळले तरी आता मी टळायचो नाही !

दाट दाट स्मरणांच्या जंगलात शिरलो की...
मी पुन्हा मलासुद्धा आढळायचो नाही !

ही धरा धरेना का कोंब एकही साधा ?
मी इथे पुन्हा आता कोसळायचो नाही !

सांग सांग गतकाळा, सांग हे भविष्याला...
गाडला न गेलो मी...मी जळायचो नाही !

पाळल्या न दोघांनी दोन या अटी साध्या...
त्रास तू न मज द्यावा...मी छळायचो नाही !

मान मी तुझी कविते का बरे झुकू द्यावी ?
तोल मी तुझा आहे...मी ढळायचो नाही !

चीड येत गेली मज यामुळेच माझीही...
वादळायचे तेव्हा वादळायचो नाही !

मी मुळात मातीचा; राहणार मातीचा...
मी हवेमुळे काही उन्मळायचो नाही !

पेटलोच आहे मी; पेटवीन अंधारा...
मी असा तसा आता मावळायचो नाही !

- प्रदीप कुलकर्णी

गझल