दुष्काळ....

चांदणी लाड. - ⏱ १ मिनिट

फसव्या तुला शब्दांचा, कैसा विटाळ आहे?,
सांभाळुनी रहा तू, जग हे कुचाळ आहे,


आलास का परतुनी? देण्यास घाव आता,
केलास वार जो तू, तो ही मधाळ आहे.


रागावता असा तू, मी हासते जराशी,
व्यर्थ तुझेच कोपन, इतुके मवाळ आहे.


शोधू कुठे तुला मी? का काळजात माझ्या?,
रे अंतरी तुझ्या मी, झाली गहाळ आहे.


आता चर्चा कशाला? वैतागलास का तू?
नादान मी अशी ही, थोडी खट्याळ आहे.


दे लाघवी अश्रू मज, ही दिलखुलास माग,
हासून मुखवट्यांचा, झाला सुकाळ आहे.


(ये तू अता विठ्ठ्ला, तूझीच ओढ मजला,
वारीत माणसांचा, पडला दुष्काळ आहे.)


पूरे तुझे उसासे, स्वप्निल पापण्या ही,
ढळली 'निशा' पहाटे, झाली सकाळ आहे.


वृत्त: आनंदकंद { --U-U-- /--U-U-- }
***********************निशा[चांदणी]

गझल