.....................................
...एकंदरीने !
.....................................
झुंजले रात्रीसवे बेहत्तरीने...!
स्वप्न झाका फाटक्या या चादरीने !
चंद्र-तारे दे मला कविता कराया...
का मनाची भूक भागे भाकरीने ?
लावुनी धरलेस ते आयुष्यभर तू...
बोललो होतो कधी जे मस्करीने !
द्वेष कोणाचाच कोणी करत नाही...
सांगता येईल का हे खातरीने ?
`शेवटी लाथाच का माझ्या कपाळी ?`
- एकदा तक्रार केली पायरीने !
आवडेनासा अता पाऊस झाला...
कोरडे केले मला एका सरीने !!
पाहिला आहे पऱ्यांचा गाव कोणी ?
मी तरीही शोधतो माझ्या परीने !!
ओळखावी नीट ताकद लेखणीची...
जे लिहावे, ते कसे मातब्बरीने !!
दोन ओळींतून सारे व्यक्त होते...
होत नाही व्यक्त जे कादंबरीने !
खूप हिंडवलेस तू दुनियेत बाबा...
ने मला रस्त्या, अता माझ्या घरी ने !
हां, अता नाहीस तू, ही खंत आहे...
ठीक आहे पण तसे एकंदरीने !!
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा