===================
"एवढे फिरून सांग काय तू कमावले?"
थांबताच मी, मला विचारतात पावले
चाललो धरून दाट सावली मनातली,
मी मला उन्हात ना कधीच आजमावले..
मी फुलायची मिजास बाळगू तरी कशी?
रोपटे नवीन मी कुठे अजून लावले?
काय ही रसायने अबोल पापण्यांमधे-
तू भरून पाहता, मला भरून पावले!
खोल ते घड्याळ, आज शोध घेऊया जरा
कोणत्या पळात प्रेम नेमके दगावले?
-ज्ञानेश.
====================
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा