गझल

अनंत ढवळे - ⏱ १ मिनिट





सगळे काही पूर्वनियोजित , आपण नव्हतो
या व्यवहारामधे निमंत्रित  , आपण नव्हतो


संदेहाच्या परिघांवरती जगलो  आपण
म्हणावयाला कपोल कल्पित आपण नव्हतो

जेंव्हा केंव्हा भरून आले , रडते झालो
कुणी महात्मे अथवा प्रेषित आपण नव्हतो

दुनियेच्या दोषांवर देखिल प्रेमच केले
डाग मोजण्याइतके  शुचित आपण नव्हतो


वसंत कोठे निघून गेला , कळले नाही
कळावयाला तेंव्हा शुध्दित आपण नव्हतो

अनंत ढवळे





गझल