माळले केसात तुझिया गंध ज्यांचे
कोण जाणे काय झाले त्या फुलांचे
काल फुललो बहर झालो बहाव्याचा
आज आहे झाड वठले आसवांचे
भेटल्या हातात गुंफून हात होत्या
प्रेम कां ते फक्त होते सावल्यांचे ?
झगमगाटाला भुलूनी धावले जे
मागचे हरवून गेले गाव त्यांचे
त्याच त्या कुरवाळुनी कंटाळलो मी
दे अता पत्ते नवे तू वेदनांचे
सोयर्यांनी माझिया जे धाडलेले
नाव मागू मी कशाला गारद्यांचे ?
पावसामध्ये कुणा कळलेच नाही
काठ झाले कधी ओले पापण्यांचे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा