गझल : ज्यामुळे जग ही नशीली रम्यता राखून आहे

वैभव वसंतराव कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

ज्यामुळे जग ही नशीली रम्यता राखून आहे
ते तुझे अपसव्य कुठली सव्यता राखून आहे

येथले अस्तित्त्व जपणे हे खरे खोटारडेपण
बन अशी आख्यायिका जी सत्यता राखून आहे

तोडले केव्हाच आपण आपले नाते तरीही
का अशी , ते एक हल्की तन्यता राखून आहे

जीवघेण्या वेदनांवर हासणारी सांत्वने ही
पण तरी कळीज माझे सभ्यता राखून आहे

दाद द्यावी ह्या, मनाच्या एवढ्याश्या ओसरीला
एवढ्या दाटीतही जी , भव्यता राखून आहे

विठ्ठला तू ऐकशिल ना तर तुझ्या झरतील आर्ता**
आजही मन त्या गझलची शक्यता राखून आहे

-वैवकु

गझल