प्रिये तुला मी सांगुन थकलो प्रेमाचा बाजार हवा
'प्रेम' शब्द ना पुरतो... आता.. शब्दांचा भडिमार हवा
ऐकाया तू आज नसे, पण तशी मलाही खंत नसे
कारण हृदयीं मल्हाराला ऐकुन होते गार हवा
तार छेडता आठवणींची दोन स्वरांच्या खेळाला...
रोज वाटते षड्जासाठी फक्त तुझा गंधार हवा
चंद्र रातचा बहरुन जाता मिळु दे कोणा संजिवनी
पहाट होता पानफुलांना दवासारखा यार हवा
वाद घाल तू रोज कितीही वा काही बोलूच नको
शब्द असू दे उणे-थिटे, पण प्रेमाला आकार हवा
रोज तुला पाहतो जरासे काठावरती फिरताना
उतर कधी पाण्यामध्ये.. तुज देतो जो आधार हवा
'ऐवज' सारा माझ्यापुढती मांडुन कोणी गेले गं...
शब्द नको चमचमते त्यांचे फक्त तुझा होकार हवा
शब्द कुणाचे जखमी करती तेंव्हा येशी भेटाया
रोज तुला भेटण्या मलाही गझलेचा आजार हवा
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा