घर

ज्ञानेश. - ⏱ १ मिनिट

--------------------------------------

घराला राहिले आता कुठे घर
स्वत:चे गाव सोडुन चालले घर

असे कित्येक जागी वाटते की
इथे नक्कीच नाही आपले घर

कसे माझ्याघरी पोचायचे मी
असे रस्त्यात जर आले तुझे घर

मिळाला फक्त दर्जा 'बायको'चा
तिला सोडून यावे लागले घर

विकत घेऊन आलो एक जागा
विकावे लागले आहे जुने घर

मलाही धीर झाला एकदाचा
तुलाही पाहिजे होते नवे घर

-ज्ञानेश.

-------------------------------------

गझल