हातघाई

गणेश धामोडकर - ⏱ १ मिनिट

एकट्याची हातघाई चालली
ही स्वतःसंगे लढाई चालली


रे भिकार्‍यांनो,लुटा ही देवळे
देवतांची गाइगाई चालली


बांधतो आहे बुटाचे बंद मी
फाटक्या चपलेत आई चालली


घेऊनी थैली रिकामी परतलो
शेर ना माझी रुबाई चालली


बंद कर तू नाकडोळे आपले
बंगल्यामध्ये मिठाई चालली


वाचणारा एकही नाही मला
चालली, वायाच शाई चालली!


-गणेश एस्.एम्. धामोडकर

गझल