...हे नसे थोडके !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

........................................
...हे नसे थोडके !
........................................


घुमे आज प्राणातुनी बासरी....हे नसे थोडके !
रुळू लागले गीत ओठांवरी... हे नसे थोडके !


तुझ्या जीवनातून बाहेर गेलो जरी फेकला ....
मनाची तुझ्या लाभली ओसरी...हे नसे थोडके !


नभा, श्रावणाची अपेक्षा कधी ठेवली सांग मी ?
मिळाल्या मला फक्त काही सरी...हे नसे थोडके !


पुन्हा भेट होईल, होणार नाही...न झाली तरी...
स्मृती गोड काही तुझ्या अंतरी...हे नसे थोडके !


मने एक होतील याची न खात्री, न काही हमी...
तरी सांधली जात आहे दरी...हे नसे थोडके !


खुलासा कधीही न केला, न काहीच मी बोललो...
तुला मौन माझे समजले परी...हे नसे थोडके !


मला आत कोणी न येऊ दिले वा न जाऊ दिले...
अखेरी मिळाली मला पायरी...हे नसे थोडके !


भुकेजून गेलो, असे मी स्वतःला म्हणावे कसे ?
दिसे रोज चित्रातली भाकरी...हे नसे थोडके !


मला खंत नाही, घरी किर्र अंधार माझ्या जरी...
दिवा तेवतो दूर कोठेतरी...हे नसे थोडके !


- प्रदीप कुलकर्णी


 


 

गझल