हे फुलांचे उधान झाडांना
एक उरले न पान झाडांना
थांबतो सावलीमधे कोणी
वाटतो हाच मान झाडांना
गूण हा त्या महान झाडांचा
खुटवती ते लहान झाडांना
ऐकती दूरच्या ऋतूंना ते
तीक्ष्ण असतात कान झाडांना
ते न पुसतात जात कोणाची
धर्म सारे समान झाडांना
का अताशा कमी पडे छाया
पाहिजे का दुकान झाडांना
र्हस्व होत्या सरी वळीवाच्या
दीर्घ होती तहान झाडांना
- वैभव देशमुख
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा