हुंदका उरातच गोठवायचा आहे

वैभव वसंतराव कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

हुंदका उरातच गोठवायचा आहे
हा त्रास मला कोळून प्यायचा आहे

चालला कुठे हा कळप झुरत हरणांचा
का , पुढे 'सुखांचा झरा' यायचा आहे

कोरंट तरी आपली फुलुन येते का
अन् तुला नवा फुलबाग घ्यायचा आहे

"नागरीक"चा एवढा अर्थ आहे की
हा देश मलाही वाचवायचा आहे

तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे

बोलवेन तेव्हा काम टाकुनी ये तू
बस् तुला ....एक झोकाच द्यायचा आहे

लागेल मला ज्या क्षणी झोप जन्माची
विठ्ठला तुला 'पाळणा' गायचा आहे

~वैवकु

गझल