इच्छा ..

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

पुन्हा भेट घेण्या पुन्हा आठवावे
बसाव्यात गाठी नि गुंते सुटावे


तुझे ध्येय गगनात घेण्या भरारी
तुझ्या आठवांना तुझे पंख यावे


जशी काच असते पुढे आणि मागे
तुला मी - मला तू तसे ओळखावे


चमकले सितारे नभीचे हजारो
कसे गीत धरतीवरी आळवावे ?


पुरे जाहले रे तुझे तेच रडणे
अता मी वदावे तसे तू करावे


जशी शर्करा एक पाण्यात होते
तसे श्वास माझे-तुझे एक व्हावे

गझल