जाच

मधुघट - ⏱ १ मिनिट

होतो जैसा, तसाच


आहे मी एकटाच!


 


काटा टोचे न आज


झाली ही कठिण टाच!


 


हसशी का मंद मंद


डोळे मिटुनी उगाच?


 


सोड जरा बाहुपाश


घेउन अधराची लाच!


 


येता मी सामोरा


होशी तू आरसाच!


 


का मी हे मान्य करू..


तीन अधिक दोन पाच?


 


मारी सूर्याशी पैज


आहे तो काजवाच!


 


पुसल्या मी सर्व खुणा


एक ठसा राहिलाच!


 


देवा संपेल कधी..


क्रौर्याचा नग्न नाच?


 


व्रण आता बुजला, पण


सल मागे राहिलाच!


 


मरणाने सुटणारा


जीवन हा एक जाच!

गझल