अश्रु तुझे मनावर या ढाळशील का तू?
माझ्या मनास नाहीतर जाळशील का तू?
तक्रार मोगरा करतो, 'स्वस्त हा किती मी!'
किंमत तयास देण्या, तो माळशील का तू?
देणार ना तुला मी स्वप्नात त्रासही पण
रात्रीस झोपणे आधी टाळशील का तू?
तू नावं भेटलेल्यांची सांगशील जेव्हा
माझेच नाव तेव्हाही गाळशील का तू?
कंटाळलो नव्या वचनांना तुझ्या अता मी
ते मागचेच वचन आधी पाळशील का तू?
आरोप हा तुझा की आहे खट्याळ मी....पण
आधी पदर तुझा तो सांभाळशील का तू?
ही रात्र संपण्याच्या बाकी अजून वेळा
गातो अता गझल ही, कंटाळशील का तू?
ह्रषिकेश चुरी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा