जगण्याचे मातेरे होते...

वैभव देशमुख - ⏱ १ मिनिट

जगण्याचे मातेरे होते
मग कवितेचे सोने होते

दोन दिवस मी रडलो नाही
उदास सारे झाले होते

दारोदारी झाडे होती
झाडोझाडी झोके होते

पेन रात्रभर हाती होता
पान रात्रभर कोरे होते

मी मातीत मिसळलो तिथल्या
गंध फुलांना माझे होते

- वैभव देशमुख

गझल