जिंदगानी

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

वेळ सारा घेत गेली जिंदगानी
जायच्या वेळेत गेली जिंदगानी


माणसे नी माणसे नी माणसे बस
जे नको ते देत गेली जिंदगानी


नेमकी होताच इच्छा पूर्ण काही
लाच घेण्या येत गेली जिंदगानी


मी असावे मद्य किंवा भांगगोळी
हेलकावे घेत गेली जिंदगानी ( मतल्यात आलाय, चालते का? )


आमचे मन आमचा सम्राट आहे
आमची सेवेत गेली जिंदगानी


जात गेलो, जायचे होते न होते
ज्या ठिकाणी नेत गेली जिंदगानी


ही सुरू होणार की होणार नाही?
एवढ्या शंकेत गेली जिंदगानी


मी असावे गप्प, आली जिंदगानी
मी करावे बेत, गेली जिंदगानी


शोध लागे आज! ती गेली कुठे हा
सारखी आशेत गेली जिंदगानी


बायको नांवास रामाची, खरी तर
जानके, लंकेत गेली जिंदगानी


आत्महत्या शेवटी अंजाम आहे
ये, न येवो शेत, गेली जिंदगानी


ईश्वरा गावास वळसा, आणि कळसा
आमच्या काखेत, गेली जिंदगानी


सागराचा काठ माझी जिंदगानी
रेत आली, रेत गेली, जिंदगानी


ना मजाशी राहिली माझ्यात जेव्हा
ठेवुनी हे प्रेत, गेली जिंदगानी


 


 


 


 

गझल