.......................................
...जन्म चकव्यासारखा !
.......................................
भेटशी का सांग फसव्यासारखा ?
टाळशी का कर्जबुडव्यासारखा ?
या मनाचा कोणता आजार हा ?
वाटतो आराम थकव्यासारखा !
सोस तू आयुष्य मर्दासारखे...
सारखा रडतोस, हळव्या, सारखा !
अवनती ही आज उजव्याची किती...
भासतो डावाच, उजव्यासारखा !
पाळला जावा, असे आहे कुठे ?
शब्द हा माझा न फतव्यासारखा !
केस रात्री मोकळे झाले तुझे...
गंध आला धुंद, मरव्यासारखा !
गोष्ट माझी मी सुरू केली पुढे....
गाव हा बसला उकिडव्यासारखा !
हा हवा होता गुलाबी ना जरा ?
रंग मेंदीचा न तळव्यासारखा !
दाबली माझ्यातली ठिणगी कुणी ?
मी अता पसरेन वणव्यासारखा !!
चेहरा डोळ्यांपुढे येतो तुझा...
जे न सुचले, त्याच कडव्यासारखा !!
वाट मृत्यूच्या दिशेने चालता...
लागला हा जन्म चकव्यासारखा !
- प्रदीप कुलकर्णी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा