जन्म एक मध्यरात्र वाटतो

वैभव वसंतराव कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

जन्म एक मध्यरात्र वाटतो
मग तुला स्मरून मी पहाटतो

ज्यापुढे उडून दाखवायचे
तोच आपला पतंग काटतो

ती मला बघून उर्दुळाळते
अन् तिला बघून मी मर्‍हाटतो

हा नको म्हणूस फक्त ओंडका
एक ओंडकाच जग कलाटतो

मी सडाफटिंग राहतो जगी
मी मनामधे कुटुंब थाटतो

राखली किती कसून गुप्तता
आपला विषय तरी चव्हाटतो

बांध फाटके किती शिवायचे
रोज पापण्यांत पूर दाटतो

विठ्ठला पुन्हा मला झपाट तू
आणि मी पुन्हा तुला झपाटतो

~ वैवकु :)

गझल