प्रकाशाचे पुरे साम्राज्य सुस्तीला दिले
निशेचे घेतले काळोख, मस्तीला दिले
जुने होते बरे की काय आता वाटते
तुझ्यापाशी उगाचच मन दुरुस्तीला दिले
कुठे घेऊन गेलो देह माझा शेवटी?
मिळाले सर्व जे वस्तीत, वस्तीला दिले
दिले सोडून केव्हाचेच रुंजी घालणे
तुझ्यामागे मनाला फक्त गस्तीला दिले
हसू येते अता, नामानिराळा राहिलो
सुवर्णाची गदा, लंगोट कुस्तीला दिले
असावे पुण्य नरकातील काही आपले
म्हणूनच जन्म देवाने प्रशस्तीला दिले
तसा मृत्यूच आहे चित्रपट, .....जीवन कुठे?
जरा गर्दी जमेपर्यंत पुस्तीला दिले
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा