जसे काल होते तसे आज वाटे

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

रित्या मंदिरी चाळ - पखवाज वाटे
तिथे तुणतुणेही अता झांज वाटे


मिळे दाद नृत्यांस वा! व्वा!! फुकाची..
न तोडा, न ठसका, न तो बाज वाटे


कुण्या गावचा मीच माजी भिकारी
तरीही उगा द्यायची लाज वाटे


असे काळजाचे सदा होत तुकडे
प्रिया 'होय' म्हणताच कोलाज वाटे


नको दाखवू नवनवे रोज काही
जसे काल होते तसे आज वाटे


जिथे भाषणालाच बंदी असे, पण...
तरीही तयांचेच ते राज वाटे


कुणी घेत उचलून डोई सुखाला
इथे वेदनेचाच सरताज वाटे

गझल