झालास 'बेफिकिर' तू काहीतरीच आता

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

एकंदरीत तीही कंटाळलीच आता
अन वाटते मलाही व्हावे कवीच आता

माझा न एक दमडा, ना नाइलाज माझा
नाही तिथे कशाला बोला उगीच आता?

हेही करून झाले, तेही करून झाले
मी कोण नेमका ते सांगा तुम्हीच आता

केलेस काय तू ते कळले अता तुलाही
मीही असाच आता, तूही तशीच आता

असतात अंतरेही नात्यामधे जरूरी
माझ्यातुझ्यात का पण नुसती दरीच आता?

माझे भविष्य सध्या जोपासतो इथे मी
हातात रोज येते रेषा नवीच आता

आधी तुझा मलाही आदर बराच होता
झालास 'बेफिकिर' तू काहीतरीच आता

गझल