का हवी असतात तेव्हा नेमकी रुसतात नाती?

बेफिकीर - ⏱ १ मिनिट

का हवी असतात तेव्हा नेमकी रुसतात नाती?
का सुरू होतात तेव्हा स्वप्न दाखवतात नाती?

ते जिथे भेटायचे ती बाग ते विसरून गेले
गंध बेसावध क्षणी तेथील आठवतात नाती

आपले ते आपल्याला नेमके माहीत असते
दाखवायाला जगाला वेगळी असतात नाती

असुन आरक्षीत जागाही, जशी गाडीच चुकते
पाहिजे असतात तेव्हा नेमकी नसतात नाती

एरवी वर्षानुवर्षे भेटणेही होत नाही
बातमी येता, स्मशानी तेवढी जमतात नाती

पाडवा, राखी, दिवाळी, वाढदिवशी हासती पण
वाटणी होते जशी, तेव्हा खरी कळतात नाती

'बेफिकिर' डुंबून घे तू लाट आली माणसांची
जाणवेपर्यंत त्यांची ओल, ओसरतात नाती

गझल