काळजी

आनंदयात्री - ⏱ १ मिनिट

जायचे असल्यास जा पण वेळ आहे आंधळी
सोबतीला गंध ने तू, घे, चुरड ही पाकळी

जीवघेण्या वादळाशी झुंजणे नव्हते नवे
बरसणार्‍या आसवांनी घेतला माझा बळी

पापणी मिटताच अजुनी वाटते दिसशील तू
अजुनही केवळ तुला ती वाट आहे मोकळी

दु:ख विरहाचे तुझ्या कोंडू नये मेघांतरी
शिंपल्यामधुनी पडावे दान माझ्या ओंजळी

चल अता विसरून जाऊ एकमेकांच्या खुणा
चल अता ओढून घेऊ आतमध्ये पोकळी

काळजी तू सोड माझी, घे स्वतःची तेवढी
यापुढे माझी तुझी  अन् काळजीही वेगळी

                                          

गझल