आज पौर्णिमा नभात काय फायदा?
चांदणे नसे मनात काय फायदा?
वेचला मरंद तू जरी फुलांतुनी
वाटलास ना कुणात! काय फायदा?
पोटचे विकूनही न पोटभर मिळे
जन्म देउनी जगात काय फायदा?
चंद्र, चांदण्या खुडून आणशीलही
भाकरी न जर पुढयात काय फायदा?
दात आपलेच आणि ओठ आपले
गप्प बैस! बोलण्यात काय फायदा?
धावशील शर्यतीत जिंकण्यास तू
अडथळा ठरेल जात! काय फायदा?
शोधलेस नीट तर तुला मिळेलही
नजर ती न जर तुझ्यात काय फायदा?
ज्यात त्यात पाहतात फायदा सदा
राहुनी अश्या जनात काय फायदा?
तळटीप : वैभव जोशी ह्यांच्या सुचनेनुसार काही बदल करून ही गजल सादर केली आहे.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा