किमया

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

..............................................
किमया
..............................................

एकरूप माझ्याशी व्हावे उदकाने !
आस कोरडी बाळगली ही खडकाने !

आजच का; रोज पहाटे बघावीत की...
राजहंस झाल्याची स्वप्ने बदकाने !

कधीच गेलो मी शब्दाच्या पलीकडे...
देत बसा वेलांट्या, मात्रा अन् काने !!

लयीत एका शांतपणे तेवे ज्योती...
का तापावे, तडकावे मग तबकाने ?

कधी कधी चव इतकी येते जगण्याला...
समजत नाही आली कुठल्या घटकाने !

दोघांमधला फरक फार तर कळेलही...
सिद्ध न होई साम्य परंतू फरकाने !

म्हणा तुम्ही - ही दिव्य बासरी कृष्णाची
मी म्हणतो - ही किमया केली कळकाने !

- प्रदीप कुलकर्णी

गझल