किनारा

ॐकार - ⏱ १ मिनिट

नि:शब्द किनार्‍यावर मी गुणगुणतो, फिरतो आहे
घेऊन हजारो लाटा दर्या किरकिरतो आहे

जे कागद हाती आले त्यांचे मी काय करावे?
कोराच विचार उद्याचा सध्या भिरभिरतो आहे

आत्ताच तुझ्या स्मरणांची मी राख ठेवली मागे
हा धूर तुझ्या आभासांचा हवेत विरतो आहे

संतांनी म्हटले वाटा आनंद जगाला सार्‍या
मी माझ्या उरल्यासुरल्या काळजास चिरतो आहे

माझ्या ह्या उथळपणाच्या चर्चांना शेवट नाही
जो तो हल्ली विषयाच्या खोलातच शिरतो आहे


गझल