किती दिवस मी रदीफ व्हावे

सुनेत्रा सुभाष - ⏱ १ मिनिट

किती दिवस मी  रदीफ व्हावे बोल सख्या रे
मीच काफिया ओळख माझे मोल सख्या रे

 

कशी  अवेळी  अशी  टपकते कविता वेडी
सावर मजला जातो माझा तोल सख्या रे

 

ते   तेव्हांचे  गीत  गुलाबी  अता  कशाला?
जरी  हवेसे  बुडवी  मज  ते खोल सख्या रे

 

मम ह्रदयाची सतार सुंदर वाजत असता
का ऐकावा सदा तुझा मी ढोल सख्या रे?

 

दिवस कोरडे हे पण सरतिल मेघ वर्षतिल
स्मरण ठेव तू पृथ्वी आहे गोल सख्या रे

 

जागेपणी तव लाख बहाणे फुत्कारांचे
स्वप्नामध्ये गझलेवरती डोल सख्या रे

 

जाऊदे मज अता 'सुनेत्रा' भेट उद्या तू
तास संपला पहा वाजला टोल सख्या रे 

गझल